Breaking News
मत्स्योद्योगातील सहकाराला चालना देण्यासाठी सामंजस्य करार
नवी दिल्ली - मत्स्योद्योग क्षेत्रातील सहकारी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्था (आयसीएआर-सीआयएफई) आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (वॅमनिकॉम) यांनी सोमवारी 26 ऑगस्ट, 2024 रोजी एक सामंजस्य करार केला आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
भारतातील मत्स्यव्यवसायामुळे 14.46 दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि एकात्मिकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची पोहोच वाढवणे तसेच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांमध्ये मूल्यवर्धनास प्रोत्साहन देणे हे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे. वॅमनिकॉमआणि आयसीएआर-सीआयएफई या दोन्ही संस्था एकत्रितपणे मत्स्य, मत्स्य सहकारी आणि मत्स्यव्यवसाय परिसंस्थेच्या क्षेत्रात शिक्षण, संशोधन, क्षमता उभारणी आणि सल्लागार या दृष्टीकोनातून नवीन संधींची चाचपणी करतील.
मुंबईमध्ये आयसीएआर-सीआयएफईच्या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला या संस्थेचे संचालक आणि कुलगुरू डॉ. रवीशंकर आणि वाम्निकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव उपस्थित होत्या. या दोन्ही संस्थांचे वैज्ञानिक, अध्यापक वर्ग आणि प्रमुख सदस्य देखील यावेळी उपस्थित होते.
आयसीएआर-सीआयएफई आणि वॅमनिकॉम यांच्यात मत्स्य क्षेत्रातल्या समन्वयात वाढ करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. ज्यामुळे मत्स्यव्यवसायातील सहकारी व्यवस्थापन पद्धती वृद्धिंगत करण्याचा मार्ग प्रशस्त होईल. या भागीदारीच्या माध्यमातून या संस्था संशोधन, प्रशिक्षण आणि विकास उपक्रमांविषयी सहकार्य करतील. ज्याचा मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होऊन सहकार व्यवस्थापन धोरणे आणि पद्धतींमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
हा करार दोन्ही संस्थांच्या सामाईक उद्दिष्टांना चालना देण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावेल, असे नमूद करत डॉ. रवीशंकर सीएन यांनी या सहकार्याविषयी उत्साहाची भावना व्यक्त केली. या भागीदारीमुळे केवळ आमच्या संशोधन क्षमताच बळकट होणार नसून, आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रभावाची व्याप्ती देखील वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सहकार्यातून उदयाला येणाऱ्या सहकार व्यवस्थापनाच्या संभाव्य प्रगतीबाबत आपण अतिशय उत्साही आहोत, असे ते म्हणाले.
डॉ. हेमा यादव यांनी या सामंजस्य करारामुळे होणारे फायदे आणि निर्माण होणाऱ्या संधी अधोरेखित करत याच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. आयसीएआर-सीआयएफई सोबत सहभागी होत आम्ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकार व्यवस्थापन सिद्धांतांचे एकात्मिकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत, असे त्या म्हणाल्या. नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या क्षेत्रातील पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी परस्परांचे कौशल्य आणि संसाधने यांचा वापर करण्यास या सहकार्यामुळे मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade