Breaking News
धारावी प्रकल्पात मराठी माणसासाठी ७० ते ७५ टक्के घरे राखीव ठेवण्याची मागणी
मुंबई - मुंबईत अगदी मोक्याच्या जागी असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या जोरदार हालचाली आता सुरू झाल्या आहेत. अदानी समूहाकडून हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता निवडणुका तोंडावर असताना मुंबईतील एका संस्थेने धारावी मराठी माणसासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी उचलून धरली आहे.पार्ले पंचम या संस्थेने मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुंबईतील मराठी टक्का घसरत चालला असून मुंबईत घर घेणे मराठी माणसाला परवडेनासे झाले आहे. त्यामुळे मुंबईत मराठी टक्का घसरू नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पक्षालाच मतदान केले पाहिजे अशी भूमिका पार्ले पंचम या संस्थेने घेतली आहे.
यासाठी संस्थेने सात मागण्या केल्या आहेत. तसेच या मागण्यांचा विचार करून जाहीर भूमिका मांडावी असे आवाहनही पक्षाने केले आहे.मुंबईतील मराठी माणसांचे प्रमाण कमी होत असून मराठी माणूस हताश, निराश होतो आहे. मराठी आहे म्हणून नोकरी नाकारणे, घर नाकारणे, गिरगाव, विलेपार्ले, मुलुंड, घाटकोपर या भागात मराठी माणसाला घर विकत घेणे किंवा भाड्याने घेणे अवघड होत आहे. बहुतेक ठिकाणी मराठी माणसाला मांसाहारी म्हणून घरे नाकारली जात आहेत. मात्र या साऱ्या परिस्थितीविरोधात एकही पक्ष बोलण्यास तयार नाही. त्यामुळे पार्ले येथील एका संस्थेने मराठीचा जाहीरनामा तयार केला आहे.
जागतिकीकरणाच्या रेट्यासमोर स्थानिक संस्कृती टिकून राहावी यासाठी देशोदेशीच्या सरकारांनी युद्धपातळीर स्थानिक भूमीपुत्रांसाठी सरकारी पातळीवर घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारनेही मराठी माणसासाठी सरकारी वसाहती निर्माण कराव्यात, अशी मागणी संस्थेने केली आहे. मराठी सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात घरबांधणी व्हावी, धारावी प्रकल्पातील ७० ते ७५ टक्के घरे मराठी माणसासाठी राखीव ठेवावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर