Breaking News
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यता
नवी दिल्ली - अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवल्याने तसेच नामांतरास रेल्वे विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र प्रशासनाला दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग आता सुकर झाला झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यानं नामांतराचा मार्ग सुलभ झाला आहे.
नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने जिल्ह्याशी निगडित प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी करुन अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वेस्थानक देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केल्याने जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यातील पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात भाषण करताना अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला. आता रेल्वे मंत्रालयानेही याला मान्यता दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर