Breaking News
लाल समुद्रात ४ दिवसांपासून जळतंय तेलवाहू ग्रीक जहाज
अथेन्स - लाल समुद्रात चार दिवसांपासून ग्रीक जहाजाला आग लागली आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी गुरुवारी या जहाजावर हल्ला केला. यानंतर जहाजाला आग लागली, जी अद्याप विझलेली नाही. लाल समुद्रातील युरोपियन युनियन नौदलाच्या एस्पाइड्स मिशनने सोमवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली.
एस्पाइड्स मिशन टीमने जहाजाच्या डेकमधून धूर येत असल्याचा फोटो शेअर केला आहे. जहाजाच्या मुख्य डेकवर पाच ठिकाणी आग लागली आहे. याशिवाय जहाजाच्या वरच्या भागालाही आग लागली आहे. वृत्तानुसार या जहाजावर दीड लाख टन कच्चे तेल आहे. जहाजाचे नुकसान झाल्यास तेलाची गळती होऊ शकते, ज्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. सध्या जहाजातून तेल गळती झाल्याची कोणतीही माहिती नाही.
गुरुवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी हुथी बंडखोरांनी स्वीकारली. इराणशी संबंधित हुथी बंडखोरांचा एक गट इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ हल्ले करत आहे. युद्ध थांबवण्यासाठी तो इस्रायलवर दबाव आणत आहे.
हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात 100 हून अधिक हल्ले केले आहेत. गेल्या काही महिन्यांत, हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात आणि आसपास 100 हून अधिक हल्ले केले आहेत. हे हल्ले टाळण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून जगभरातील व्यापारी जहाजे लाल समुद्राऐवजी आफ्रिकेतून जात आहेत. यासोबतच हुथी बंडखोर हिंदी महासागरातही हल्ले करत आहेत.
हुथी बंडखोरांनी जूनमध्ये यूएन एजन्सीशी संबंधित 9 लोकांनाही ओलिस केले होते. ओलिस घेतलेल्यांमध्ये यूएन मानवाधिकार एजन्सीचे कर्मचारी, जागतिक अन्न कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांच्या विशेष राजदूताच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश होता.
ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासच्या हल्ल्यानंतर गाझा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर लगेचच म्हणजे १९ ऑक्टोबर रोजी लाल समुद्रात संचार करणाऱ्या यूएसएस कार्नी या अमेरिकी विनाशिकेवर चार क्षेपणास्त्रे डागली गेली आणि १५ ड्रोन हल्ले झाले. हुथींकडून आलेल्या या क्षेपणास्त्रांचा अमेरिकी विनाशिकेने सहज लक्ष्यभेद केला. पण सागरी व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या असलेल्या या टापूमध्ये मालवाहू व्यापारी जहाजे आणि तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. UNO कडून प्रयत्न होऊनही या संघर्षावर उपाय सापडू शकलेला नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar