Breaking News
११ वीच्या प्रवेशासाठी तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर
मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी आज जाहीर करण्यात आली. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास स्वतःच्या लॉगिमधील ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा.
या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयांतील १ लाख १८ हजार ९३९ जागांसाठी १७ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १३ हजार १४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर तिसऱ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या ४ हजार ३४३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १ हजार ७५२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि ९२९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे.
सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे नामांकित व आवडीच्या महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्याची काही विद्यार्थ्यांची संधी हुकली. तसेच दुसऱ्या विशेष फेरीच्या तुलनेत तिसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत वाणिज्य शाखेसाठीचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) स्थिर असून १ ते २ टक्क्यांनी किंचितशी घट झाली आहे. तसेच काही महाविद्यालयांच्या कला व विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट, तर काही महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत.
शाखा – उपलब्ध जागा – निवड झालेले विद्यार्थी
कला – २२ हजार ४३ – १ हजार ३६
वाणिज्य – ६० हजार ९६६ – ७ हजार ८२९
विज्ञान – ३३ हजार ७९१ – ४ हजार १४२
व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – २ हजार १३९ – १३८
एकूण – १ लाख १८ हजार ९३९ – १३ हजार १४५
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे