Breaking News
मुंबईतील म्हाडा ३८८ इमारतींमधील रहिवासी गुरुवारी करणार आंदोलन
मुंबई - मुंबईतील म्हाडा दुरुस्ती बोर्डाच्या ३८८ इमारतींमधील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात असून गुरुवारी ते म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत म्हाडा उदासिन असल्याचे या रहिवाशांचे म्हणणे आहे.
मुंबईमध्ये म्हाडा दुरुस्ती बोर्डाच्या ३८८ इमारती असून त्यात २७ हजार कुटुंब राहात आहेत. यातील ९० टक्के कुटुंब मराठी आहेत. या इमारतींमध्ये प्रामुख्याने १२०,१६०,१८० चौरस फुटांच्या लहान खोल्या आहेत. या इमारती जुन्याही झाल्या आहेत. या इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. ३३(७) चे सर्व लाभ देऊन या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. मात्र, पुनर्विकासाचे काम पुढे सरकलेले नसल्यामुळे रहिवासी त्रासले आहेत.
याबाबत चर्चा करण्यासाठी म्हाडा संघर्ष समितीची तातडीची बैठक भायखळा येथे आयोजित करण्यात आली होती. या इमारतींच्या पुनर्रविकासासाठी म्हाडाकडून विकासकाला जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. म्हाडा विकासकाकडे २० टक्के प्रिमियम आणि इमारतीवर दुरूस्तीसाठी केलेला खर्च विकासकाकडे मागते. त्यामुळे या इमारतींचा विकास करण्यासाठी कोणी विकासक पुढे येत नाही. या सर्व इमारतींची जागा कमी आहे. त्या जागेत कशीबशी इमारत बांधली तर विकासक म्हाडाला २० टक्के प्रिमियम कोठून देणार ? त्यामुळे या इमारतींचा विकास रखडला आहे. या बाबत ३८८ इमारतीमधील रहिवासी २९ ॲागस्टच्या गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा कार्यालय येथे मोर्चा काढतील, असे म्हाडा संघर्ष समितीचे सदस्य सुभाष तळेकर यांनी नवाकाळला सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे