Breaking News
मुंबई पोलीस दलातील श्वानांना मिळणार विमा संरक्षण
मुंबई - गुन्ह्यांच्या तपासात अत्यंत जोखमीची कामगिरी बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचाही आता मुंबई पोलिसांकडून विमा उतरवला जाणार आहे.मुंबई पोलीस दलात ५२ हजार कर्मचारी आहेत. त्यांच्या मदतीसाठी श्वानपथकातील ३२ श्वान आहेत. श्वान पथकाकडे वर्षभरात ५० ते ६० कॉल येतात. यातील बहुतांश कॉल हे बॉम्ब ठेवल्यासंबंधीचे असतात. बॉम्ब शोधण्याचे अत्यंत जोखमीचे काम हे प्रशिक्षित श्वान शिताफीने करतात. त्यांच्या जिवाला सतत धोका असतो. म्हणूनच त्यांचा विमा उतरवण्यात येणार आहे. याआधी ठाण्यातील श्वानांचादेखील अशा प्रकारे विमा उतरवण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या आठ श्वानांचा विमा उतरवण्यासाठी मुंबई पोलिसांना श्वान पथकाच्या अधिकाऱ्याने पत्र पाठविले आहे.आठ श्वानांसाठी २२ हजार १२५ रुपये इतका वार्षिक हफ्ता भरावा लागणार आहे. खर्च मंजुरीसाठी पत्र मुंबई पोलिसांना पाठवले असून लवकरच मंजुरी मिळेल. न्यू इंडिया ॲश्यूरन्स कंपनीकडून हा विमा उतरवण्यात येणार आहे. यात श्वानांचा रेबीज, व्हायरल हेपेटायटीस, लेप्टोस्पायरोसिस, व्हायरल एन्टरिटिस यासारख्या आजाराने मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळेल. तसेच श्वानाची चोरी झाल्यास, कर्तव्यावर असताना अथवा शासकीय वाहनातून प्रवास करताना श्वानाला अपघात झाल्यासही विमा मिळणार आहे. दावा केल्यानंतरकंपनीकडून ८० टक्के रक्कम दावा केल्यानंतर मिळणार आहे, असे श्वान पथकातील पोलीस निरीक्षक जॉन गायकवाड यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर