Breaking News
यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची यादी मिळणार गुगल मॅपवर
महानगर
मुंबई - मुंबई महानगरातील यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविधस्तरीय उपक्रम राबवित असते. याच उपक्रमांचा भाग म्हणून श्रीगणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकांराना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने श्रीगणेश गौरव स्पर्धेचे आयोजन करणे यासारखे विविध उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतले आहेत. याच शृखंलेत यंदा नागरिकांना त्यांच्या घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती सहजपणे उपलब्ण व्हावी, या उद्देशाने सदर तलावांची यादी गुगल मॅप्सवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे श्रीगणेशोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या अशा विविध बाबींची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व्हावी व मंडळांना त्यांच्या सूचना थेट महानगरपालिका प्रशासनाकडे मांडता याव्यात, या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय बैठकीचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या निर्देशांनुसार यंदाच्या गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. आज आयोजित बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्यासह मुंबई पोलीस दलाच्या प्रतिनिधी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी, तसेच महानगरपालिकेचे विविध खात्यांचे व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली.
यंदाचा गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी यंदाच्या होणाऱ्या उत्सवाबाबत माहिती दिली. यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्क साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण करण्याची सुविधा पुरविण्याकरिता समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच गुगल मॅप्समध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी भाविकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. याद्वारे गणेश भक्तांना आपल्या घराजवळ असलेल्या कृत्रिम तलावाची देखील माहिती या मॅपद्वारे मिळणार आहे. यंदा कृत्रिम तलावांची संख्या २०० पेक्षा अधिक वाढविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आल्याचेही श्री. सपकाळे यांनी बैठकीदरम्यान सांगितले.
एक खिडकी योजना सुरू
पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गेली दहा वर्षे शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील दहा वर्षात सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे व त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे स्वयंघोषणापत्र आवश्यक असणार आहे. या परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. आज, ६ ऑगस्ट पासून एक खिडकी योजनेनुसार संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
‘क्यूआर कोड’वरही मिळणार माहिती
याशिवाय ‘क्यू आर कोड’द्वारे देखील भाविकांना, गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यू आर कोड’ श्री गणेश मूर्तिकारांच्या मंडपा बाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत होणार आहे.
फिरत्या शौचालयांची संख्या वाढविणार
विसर्जनाच्या दिवशी स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), दादर चौपाटी, माहीम चौपाटी येथे भाविकांसाठी फिरत्या शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. त्यानुसार विसर्जनाच्या दिवशी फिरत्या शौचालयांची संख्या वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे