Breaking News
सर्वाधिक प्रमाणात आढळून येणार्या कर्करोगांपैकी एक आणि जगभरात कर्करोगांमुळे होणार्या मृत्यूंचे सर्वात मोठे कारण फुफ्फुसांचा कर्करोग हा एक विनाशकारी आजार आहे. पुरुषांना होणार्या कर्करोगांमध्ये सर्वात जास्त प्रमाण फुफ्फुसांच्या कर्करोगाचे असते आणि महिलांना होणार्या कर्करोगांमध्ये याचा क्रमांक तिसरा आहे. कर्करोगामुळे होणार्या पुरुषांच्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण 32% आहे तर महिलांमध्ये हेच प्रमाण 20% आहे. या कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण प्रोस्टेट कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंपेक्षा तीन पटींनी जास्त आहे आणि महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंपेक्षा जवळपास दुप्पट आहे. दरवर्षी आतडे, स्तन आणि प्रोस्टेट यांच्या कर्करोगांमुळे होणार्या मृत्यूंच्या संख्येची बेरीज केली तरी फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू जास्त असतात. भारतात सर्व कर्करोगांच्या नवीन केसेसमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण जवळपास 7% आणि कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण जवळपास 9% असते.
सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये या कर्करोगाची क्लिनिकल लक्षणे नसतात त्यामुळे याचा मृत्युदर जास्त आहे. रुग्ण डॉक्टरकडे तेव्हाच जातात जेव्हा त्यांना काही लक्षणे जाणवतात, पण तोवर कर्करोग बर्याच पुढच्या टप्प्यावर पोहोचलेला असतो. यामुळे मृत्युदर वाढतो. खासकरून 50 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये हा आजार आढळून येतो आणि 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण फक्त 2% असते. वयस्क वयाच्या रुग्णांमध्ये देखील जेव्हा इतर काही कारणांमुळे स्कॅन किंवा एक्सरे केला जातो तेव्हाच हा आजार लक्षात येतो.
डॉ. सलील पाटकर, कन्सल्टन्ट, मेडिकल ऑन्कोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबई, यांच्या मतानुसार फुफ्फुसांच्या कर्करोगाची कारणे अनेक असू शकतात परंतु त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कारण सिगरेट ओढणे हे असते. धूम्रपान करणार्या व्यक्तीला फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता धूम्रपान न करणार्या व्यक्तीपेक्षा 20 पटींनी जास्त असते. किती काळ, किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने तंबाखूचे सेवन केले जाते यावर देखील या कर्करोगाचा धोका अवलंबून असतो. याच्या इतर कारणांमध्ये हवेच्या प्रदूषणाचा देखील समावेश आहे. खास करून इंधनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण, ऍसबेसटॉस, आर्सेनिक आणि इतर ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन्स फुफ्फुसांच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे कुटुंबात आधी कोणाला फुफ्फुसांचा कर्करोग झालेला असणे, पोषणातील कमतरता (अ, ब आणि क जीवनसत्वे), पदार्थांचा गैरवापर आणि ओपीओईड्सचे सेवन ही देखील याची कारणे आहेत.
सध्या जरी फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या 90% केसेसचे कारण धूम्रपान असले तरी धुम्रपानविरोधी मोहिमांमुळे भविष्यात हे प्रमाण कमी होईल आणि धूम्रपान न करणार्या व्यक्तींमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा आहे. धूम्रपान न करणार्या व्यक्तींमध्ये हा आजार आधीच्या वयात होतो आणि बर्याच पुढच्या टप्प्यात पोहोचल्यावर लक्षात येतो.
मानवी विकास निर्देशांक ही अजून एक बाब आहे जी फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण आणि त्याच्या मृत्युदराशी संबंधित आहे. जीवनाचा दर्जा, आरोग्य आणि आरोग्य सेवासुविधा, आर्थिक व सामाजिक सुरक्षा या मूलभूत घटकांनुसार मानवी विकास निर्देशांक निश्चित केला जातो. अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, विकसित देशांमध्ये कोणत्याही वयोगटामध्ये कर्करोगाचे प्रमाण हे कमी विकसित देशांमधील कर्करोगाच्या प्रमाणापेक्षा 2 पट जास्त आहे. विकसित देशांमध्ये वयस्क लोकसंख्येचे प्रमाण जास्त असणे हे याचे कारण असू शकते. परंतु कमी विकसित देशांमध्ये देखील सिगरेट ओढणे आणि तंबाखू सेवनात वाढीमुळे कर्करोगाच्या केसेसमध्ये वाढ होत आहे.
डॉ. सलील पाटकर यांच्या अभ्यासानुसार फुफ्फुसांच्या कर्करोगाचे काही लक्षण रुग्णांना निदर्शनास येतात नवीन प्रकारचा खोकला सुरु होणे आणि तो तीन आठवडे किंवा त्यापेक्षा दीर्घकाळपर्यंत टिकून राहणे, खोकल्यामध्ये बदल होणे, खोकताना रक्त बाहेर येणे, छातीमध्ये पुन्हा पुन्हा संसर्ग होणे, तो दीर्घकाळपर्यंत टिकून राहणे आणि कोणत्याही उपचाराने बरा न होणे, छातीमध्ये वेदना किंवा खांदे दुखणे, श्वास पूर्ण न घेता येणे, आवाज घोगरा होणे ही फुफ्फुसांच्या कर्करोगाची काही लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे वजन घटणे किंवा भूक न लागणे ही देखील लक्षणे जाणवू शकतात. बर्याचदा ही लक्षणे फारशी तीव्र नसतात आणि इतर काही आजार असेल असे वाटते, सहाजिकच फुफ्फुसांचा कर्करोग झाला आहे असे निदान होण्यास उशीर होतो. यामुळे बहुतांश केसेसमध्ये आजार लक्षात येईस्तोवर तो इतर भागांमध्ये पसरलेला असतो.
फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झाल्यास, म्हणजे जेव्हा ट्युमर पसरलेला नसतो तेव्हा झाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. रुग्ण 5 वर्षे जिवंत राहण्याचा दर 75% इतका वाढू शकतो आणि अनेक रुग्ण बरे देखील होऊ शकतात. परंतु ज्या रुग्णांच्या बाबतीत रोग खूप पुढच्या टप्प्यावर पोहोचला असेल आणि इतरत्र पसरला असेल त्यांच्यामध्ये मात्र 5 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकण्याचा दर देखील जवळपास 4% असतो. यावरून असे लक्षात येते की, फुफ्फुसांच्या कर्करोगाची तपासणी करवून घेणे आवश्यक आहे जेणेकरून काही ट्युमर असल्यास तो खूप आधीच्या टप्प्यात लक्षात येऊ शकतो. धूम्रपान करणार्या व्यक्तींसारख्या सर्वाधिक धोक्यामध्ये असलेल्या केसेसमध्ये 55 वर्षे वयानंतर तपासणी करवून घेणे अत्यावश्यक आहे. वाढते वय, धूम्रपान आणि हवेचे प्रदूषण यासारख्या अति धोकादायक बाबींची माहिती असल्यास रोगाचे लवकरात लवकर निदान व्हावे आणि या त्याचा यशस्वीपणे मुकाबला करता यावा यासाठी प्रभावी योजना आखता येऊ शकतात.
फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी केल्या जाणार्या तपासण्यांमध्ये एक्सरे आणि सिटी स्कॅन यासारख्या इमेजिंग टेस्ट्स आणि स्पटम सायटोलॉजी आणि टिश्यू बायोप्सी यांचा समावेश होतो. रोगाचे निदान झाले की त्याचे स्वरूप निश्चित ओळखले जाण्यासाठी सीटी स्कॅन, मॅग्नेटिक रिजोनान्स इमेजिंग (एमआरआय), पोसिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) आणि बोन स्कॅन केले जातात. यावरून कर्करोगाचे प्रमाण लक्षात येते आणि रोगावरील पुढील उपचारांची दिशा निश्चित करण्यात मदत मिळते. कर्करोग कोणत्या टप्प्यावर पोहोचला आहे त्यानुसार उपचार ठरवले जातात. यामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा टार्गेटेड ड्रग थेरपी (एक किंवा संयुक्त) यांचा समावेश असू शकतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाचा मुकाबला करण्यासाठी छोट्या मॉलिक्यूल ड्रग्स किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीजसह टार्गेटेड थेरपीज हे सर्वात नवीन उपलब्ध उपचार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya