Breaking News
को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरु झालेल्या आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कॅरम स्पर्धेमधील पुरुष एकेरी गटात जनकल्याण बँकेचा भार्गव धारगळकर, ग्रेटर बँकेचा राजेश देसाई, एनकेजीएसबी बँकेचा अतुल काकीर्डे, मालाड सहकारी बँकेचा प्रज्वल चोरगे, चेंबूर नागरिक बँकेचा गणेश सातर्डेकर, अपना बँकेचा रणजीत यादव आदींनी सलामीचे सामने जिंकले. भार्गव धारगळकरने दोन्ही सेटमध्ये राणीवर वर्चस्व राखत रियाल जावकरचा १६-०, १९-३ असा सहज पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, विमा कामगार को-ऑप. बँकेचे अध्यक्ष प्रशांत सावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.
विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित कॅरम स्पर्धेतील राजेश देसाई विरुध्द इंद्रनील देसाई यामधील लढत चुरशीची झाली. प्रारंभी आघाडी घेणाऱ्या इंद्रनील देसाईला निर्णायक क्षणी अचूक खेळ करीत राजेश देसाईने ४-६, १०-९, १२-१० असे नमविले. सुरुवातीला पिछाडीवर राहूनदेखील अतुल काकीर्डेने महादेव जावीरला ४-१२, १६-१, १३-१० असे चकविले. अन्य सामन्यात प्रज्वल चोरगेने सचिन मेस्त्रीचा १३-०, ८-९, १६-० असा, गणेश सातर्डेकरने अक्षय ताकवेकरचा २०-५, ११-२ असा, सुशांत सावंतने सचिन काटकरचा ०-१६, १६-०, १४-० असा तर रणजीत यादवने दीपक गुप्ताचा २२-०, २५-० असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, जनार्दन मोरे आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant