Breaking News
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांची अविरत साहित्य सेवा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सारस्वतांनी तयार केलेल्या विशेष साहित्य फराळासह चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात दिवाळी निमित्त उत्तमोत्तम रचनांचा नजराना पेश केला.
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने ९वे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी युवा साहित्यिक, अभिनेते, गायक तसेच कवी/गीतकार महेंद्र रामचंद्र पाटील हे अध्यक्षस्थानी होते. त्यांचे ज्येष्ठ कवी अशोक कांबळे यांच्या हस्ते तसेच 'शोध आनंदाचा फाऊंडेशन'चे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि 'मराठी साहित्य व कला सेवा'चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये मानाची शाल, "कल्पदीप" ह्या पुस्तकाची कल्पना मापूसकर यांच्या उपस्थितीमध्ये तसेच स्वाक्षरीसह ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.
कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये अशोक बिरबल कांबळे, शोभा प्रकाश कोठावदे, आश्विनी सोपान म्हात्रे, विक्रांत मारूती लाळे, नंदन भालवणकर, वैभवी विनीत गावडे, डॉ. मानसी पाटील,अनिल खेडेकर, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, रविंद्र शंकर पाटील, सरोज सुरेश गाजरे, कल्पना दिलीप मापूसकर, हर्षा हिरा पाटील, विनोद तुळशीराम घाणेकर, गौरी यशवंत पंडित, प्रमोदिनी अनिल देशमुख, रामकृष्ण चिंतामण कामत, सीमा विश्वास मळेकर, श्रीशैल नंदकुमार सुतार, किशोरी शंकर पाटील तसेच सनी आडेकर यांनी दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष महेंद्र रामचंद्र पाटील यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
मध्यंतरामध्ये आयोजकांनी आणलेल्या चहा अल्पोपहारासोबत महेंद्र पाटील यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले गुलाबजाम, समोसे आणि बर्फी, तसेच गौरी पंडित, शोभा कोठावदे, सरोज गाजरे यांनी आणलेला गोडाधोडाच्या खाऊचा आस्वाद घेताघेता अनिल खेडेकर यांनी सादर केलेली मैत्रीवरची सुंदर लघुकथा सर्वांना मैत्रीची व्याख्या सांगून गेली. नंदन भालवणकर तसेच पूर्व संमेलनाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी त्यांच्या रचना गेय स्वरुपात सादर केल्या. दुसर्या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.
संमेलनाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सादर केलेल्या "दगड" कवितेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी आयुष्यात पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. गुरू सरांचे शिस्तबध्द सूत्रसंचालन अतिशय उत्तम होते. कविता ऐकण्यासाठी आलेले खास आस्वादक ह्यांची मनोगतेही उत्तम होती. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या. तसेच पुढील संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी डॉ. मानसी पाटील यांचेही अभिनंदन केले.
कार्यक्रमाचा आणि कवितांचा आस्वाद घेण्यासाठी ज्यांचा आवाज त्यांची ओळख आहे त्या साहित्यिका निवेदिका अभिवाचक ग्रंथपाल नमिता नितीन आफळे विशेषत्वाने उपस्थित होत्या. बालकवी वेदान्त पंडित, ज्येष्ठ कवी अशोक भाई नार्वेकर, अनिल (काका) देशमुख, प्रकाश कोठावदे, सुनिता निरज कोठावदे आणि देविका अशोक कांबळे रसिक म्हणून आवर्जून उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील आणि विक्रांत लाळे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता करताना "शोध आनंदाचा फाऊंडेशन" चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
अलिबाग सहल कविसंमेलन ७-८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी विक्रात लाळे 9322866947, शैलेश निवाते 9773873538 आणि रविंद्र पाटील 8928490260 यांच्यासोबत संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.
१०वे मासिक कविसंमेलन शनिवार २१ डिसेंबर २०२४ (अंदाजित) होणार असून त्याच्या अध्यक्षपदी भौतिकोपचार तज्ज्ञ तसेच साहित्यिका डॉ. मानसी पाटील असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर