Breaking News
निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदली
मुंबई - राज्यात २० नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाकडूनही निवडणूक प्रक्रीया पारदर्शक होण्यासाठी सतर्कपणे कारवाई करत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्या ५ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रांरीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रश्मी शुक्ला या वादग्रस्त अधिकारी असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी आयोगाला पत्र देखील पाठवले होते. रश्मी शुक्ला जोपर्यंत या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणूक होणे अवघड असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
राज्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर तब्बल २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील १५ अधिकारी हे मुबंईतील होते. पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील ३०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. पण राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, डीजीपी, पोलीस महासंचालक यांची बदली करण्यात आली नव्हती. त्यामुळे २० नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची मागणी रश्मी शुक्ला काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.
रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरल्या होत्या. दरम्यान, रश्मी शुक्लांच्या बदलीविषयी प्रश्न विचारलं असता यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे आयोगावर कॉंग्रेस पक्षाने नैतिक दबाव निर्माण केला होता. शुक्ला यांचा कार्यकाळ जून २०२४ ला संपला होता. त्यांना २०२६ पर्यंत एक्स्टेंशन देण्यात आलं होतं. नियमानुसार जास्तीत जास्त ६ महिन्याची मुदतवाढ देता येते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे