Breaking News
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली -:भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता. त्यामुळे मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा असेल.
संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र आणि राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. १९९२मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.
अत्यंत तळागाळापासून काम सुरू करून विविध राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या पेलत विजयाताईंचे नेतृत्व विकसित होत गेले. प्रत्येक ठिकाणी समरसतेने काम करून आपल्या कौशल्याचा 100% लाभ त्या पदाला देऊन ती जबाबदारी सर्वोत्तम पार पाडणे हे विजयाताईंचे वैशिष्ट्य राहिले आहे. महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे.
त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करीत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळविलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.
भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजयाताईंनी “सक्षमा”, “प्रज्ज्वला”, “सुहिता” यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबविले. “सक्षमा” उपक्रमा मधून ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे. विजयाताईंनी डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी, महिला आयोगाचे “साद” नियतकालिक यासारखे उपक्रम देखील घेतले. एका अर्थाने त्यांनी आयोगालाच पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले होते.
2007 ते 2010 या कालावधीत तत्कालीन औरंगाबाद आणि विद्यमान छत्रपती संभाजी नगरच्या महापौर असताना विजयाताईंनी शहर केंद्रित महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. यात आरोग्य सेवेपासून ते पायाभूत सुविधा निर्मितीपर्यंत अनेक घटकांचा समावेश होता. त्याचबरोबर शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक सांस्कृतिक केंद्र म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून दिली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाद्वारे शहराच्या महसुलात मोलाची भर घातली. महापौर पदाच्या काळात विजयाताई महाराष्ट्र मेयर कौन्सिलच्या अध्यक्षा आणि ऑल इंडिया मेयर कौन्सिलच्या उपाध्यक्षदेखील होत्या. त्या सध्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेच्या सल्लागार संचालिकादेखील आहेत.
भौतिक शास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विजयाताईंनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये ‘विधिलिखित’ या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचे संपादन , ‘अग्निशिखा धडाडू द्या’, ‘औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स’, ‘मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम’ यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर