Breaking News
गणेशोत्सवा दरम्यान मुंबई-गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी
पर्यटन
मुंबई - गणेशोत्सव अगदी १०-१२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. हजारोंच्या संख्येने गणेशभक्त कोकणातील आपापल्या गावी गणेशोत्सवासाठी जाण्यास सज्ज झाले आहेत. यावर्षी देखील मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मात्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत गणेशोत्सवा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना काही काळासाठी बंदी घातली आहे. यामुळे काही प्रमाणात तरी वाहनांची गर्दी कमी होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सरकारने सूट दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून ५ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, ५ आणि ७ दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी ११ दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १८ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहील. या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना ८ सप्टेंबर रात्री ११ वाजेपासून ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी राहील. सर्व वाहनांना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर