Breaking News
यंदाचे साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत
नवी दिल्ली - आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे.या साहित्य संमेलनासाठी सात ठिकाणाहून निमंत्रण प्राप्त झाली होती. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन आगामी साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
साहित्य महामंडळाच्या या निर्णयामुळे सात दशकांनंतर राजधानी दिल्ली येथे साहित्य संमेलन होणार आहे. यापूर्वी १९५४ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे तब्बल सत्तर वर्षांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका दिल्लीत वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या संमेलनात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो का, याकडे आता भाषा प्रेमींचे लक्ष लागून राहणार आहे.
‘दिल्लीतील हे प्रस्तावित साहित्य संमेलन मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच आपण स्थळ निवड समितीतर्फे दिल्लीमध्ये संमेलन घेण्यासाठी संधी द्यावी,’ अशी विनंती सरहदच्या वतीने अ. भा. मराठी साहित्य महामंडळाला करण्यात आली होती.
साहित्य संमेलन तालकटोरा स्टेडियम किंवा मध्यवर्ती भागात तत्सम ठिकाणी व्हावे, असा प्रस्ताव आहे. राज्यातील नेते, काही केंद्रीय मंत्री व खासदार आदींबरोबर या कार्यकर्त्यांची सुरुवातीची चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते. दिल्लीतील संमेलन फेब्रुवारीत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात भरवावे असेही संस्थेने सुचविले आहे. कारण याच काळात दिल्लीतील हवामान किमान सहन होण्यासारखे असते.
संस्थेच्या म्हणण्यानुसार तालकटोरा स्टेडियममध्ये किमान तीन ते पाच हजार साहित्यप्रेमी संमेलनाला हजर राहू शकतील. महाराष्ट्र सदन, बृहन्महाराष्ट्र भवन, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर, वेस्टन कोर्ट, संत नामदेव भवन, जैन भवन आणि दिल्लीत राहणाऱ्या मराठीजनांची घरे तसेच खासदारांची निवासस्थाने यात संमेलनासाठी येणाऱ्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. तालकटोरा स्टेडियमच्या परिसरातच पुस्तक प्रदर्शन भरवण्याचा प्रस्ताव आहे. दिल्लीमध्ये असलेल्या ज्ञानपीठ, साहित्य अकादमी वगैरे सरकारी व इतर महत्त्वाच्या प्रकाशन संस्था तसेच महाराष्ट्रातील प्रकाशकांना ७० वर्षानंतर दिल्लीत होणारे संमेलन असल्याने चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर