Breaking News
मध्य प्रदेशात मंदिराची भिंत कोसळल्याने ९ मुलांचा मृत्यू
भोपाळ - मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर शहरात आज भीषण अपघात झाला आहे. येथे मंदिराची भिंत कोसळल्याने ९ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याची घटना घडली. मदतकार्य सुरू केले असून ढीगाऱ्याखाली दंबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुसळधार पावसानंतर शाहपूर शहरातील एका मंदिराची भिंत कोसळली. या अपघातानंतर अनेक मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर घटनास्थळावरून सर्व माती आणि ढीगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काल रात्रीपासून येथे मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे ही भिंत पडल्याचे समजते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ मुलांचे वय १० ते १५ वर्षे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अचानक मंदिराची भिंत कोसळली. सावनमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी शिवलिंगाची निर्मिती करण्यात येत होती. शिवलिंगाच्या उभारणीत अनेकांचा सहभाग होता. यामध्ये अनेक लहान मुले देखील सहभागी झाली होती. यावेळी भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा अपघात हरदयाल मंदिरात झाला असल्याचे सांगितले जात आहे. हे मंदिर ५० वर्षे जून आहे. मंदिराची भिंत जीर्ण झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे की पावसामुळे कोसळली. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये परिसरातून ढीगारा हटवताना नागरिक आणि प्रशासकीय कर्मचारी दिसत आहे. गावातील अनेक नागरिकांनी देखील बचाव कार्यात सहभाग घेतला.
मध्य प्रदेशचे मंत्री गोविंद राजपूत म्हणाले, प्रशासन वेगाने मदत आणि बचाव कार्य राबवत आहे. आम्ही सर्व घटनास्थळी उपस्थित असून सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. तर जखमींच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे