Breaking News
BSF प्रमुख आणि उपप्रमुखांची केंद्र सरकारकडून उचलबांगडी
नवी दिल्ली - केंद्र सरकारनं सीमा सुरक्षा दलाच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं आहे. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि विशेष महासंचालक वाय. बी. खुरानिया यांची गृह मंत्रालयाकडून उचलबांगडी करण्यात आली आहे. याबद्दलचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीनं त्यांच्या गृह राज्यांमध्ये पाठवण्यात आलं आहे.
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची गच्छंती करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीनं आणि त्यांचा कार्यकाळ संपण्याआधी हटवण्यात येत असल्याचे आदेश सरकारनं काढले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ प्रमुखांविरोधात अनेक गंभीर तक्रार मिळाल्या होत्या. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये सीमेवर घडलेल्या घटना पाहता त्यांची उचलबांगडी करण्यात आली. बीएसएफवरील पकड ढिली झाल्यानं आणि अन्य एजन्सीजसोबत समन्वय राखण्यात कमी पडल्यानं अधिकाऱ्यांची गच्छंती करण्यात आलेली आहे.
बीएसएफच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांच्या केडरमध्ये पाठवून सरकारनं सुरक्षा दलांना स्पष्ट सूचक दिला असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. पीर पंजालच्या दक्षिण भागात वाढलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय सीमेचा मोठ्या भागाच्या संरक्षणाची जबाबदारी बीएसएफकडे आहे. त्याचं नेतृत्त्व डीजी आणि स्पेशल डीजी करतात.
गेल्या काही दिवसांत सीमेपलीकडून होणारी घुसखोरी वाढली आहे. या घटनांमध्ये सीमा सुरक्षा दलासह नागरिकांनी हकनाक जीव गमावला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हेतूंवरदेखील शंका उपस्थित होऊ लागली आहे. स्पेशल डीजींकडे जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेची जबाबदारी आहे. नितीन अग्रवाल यांची नियुक्ती जून २०२३ मध्ये बीएसएफचे प्रमुख म्हणून झाली होती. त्यांचा कार्यकाळ ३१ जुलै २०२६ पर्यंत होता. त्याच दिवशी ते निवृत्त होणार होता. पण दोन वर्षांपूर्वीच त्यांची उचलबांगडी झालेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant