Breaking News
कॉपीराइटचे उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजली आयुर्वेदला ४ कोटी दंड
मुंबई - काही वर्षांपूर्वी एक विश्वसनीय स्वदेशी ब्रॅण्ड म्हणून नावारूपाला आलेली पतंजली आयुर्वेद कंपनी सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या औषधांविषयी चुकीचा दावा केल्या प्रकरणी पतंजलीचे सर्वेसर्वा रामदेव बाबा यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली होती. त्यानंतर आता पतंजली आयुर्वेद लिमिटेडला 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काल 2023 च्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला हा दंड ठोठावला. मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणात पतंजलीच्या कापूर उत्पादनांच्या विक्रीवर या आदेशाने बंदी घातली आहे.
न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की पतंजलीने जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा पतंजलीचा हेतू होता यात शंका नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेली याचिका खंडपीठाने निकाली काढली. यामध्ये न्यायालयाच्या बंदीनंतरही कापूर उत्पादने विकल्याबद्दल पतंजलीवर अवमानाची कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायमूर्ती छागला यांनी पतंजलीला दोन आठवड्यात 4 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने कंपनीला 50 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते.
पतंजलीच्या कापूर उत्पादनाने कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मंगलम ऑरगॅनिक्सने खटला दाखल केला होता. मंगलम ऑरगॅनिक्सने नंतर अर्ज दाखल केला आणि असा दावा केला की पतंजली अंतरिम आदेशाचे उल्लंघन करून कापूर उत्पादने विकत आहे.
पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही देशातील एक सुप्रसिद्ध कंपनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी स्थापन केली होती. पतंजली आयुर्वेदाने अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे दिसत आहे. कंपनीच्या १४ उत्पादनांवर सरकारकडून कायमची बंदीही घ्यालण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे