Breaking News
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आश्वासन ; जनआशिर्वाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद
पनवेल : रायगड जिल्हा भूमिपुत्रांचा जिल्हा असून येथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या अनुषंगाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. त्याचबरोबरीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव लागण्यासाठीही प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी रायगड जिल्हा दौरा होता. यावेळी झालेल्या जन आशिर्वाद यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
रायगड जिल्ह्यातील या जन आशिर्वाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या यात्रेतून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकर्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांनी आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार केला. या यात्रेच्या अनुषंगाने जागोजागी औंक्षण, ढोल ताशे, ब्रास बँड, फटाक्यांच्या आतषबाजीत जनतेने भरभरून आशिर्वाद दिले. रायगड जिल्ह्यातील या जन आशिर्वाद यात्रेला अलिबाग येथून प्रारंभ झाला. पुढे पेण, पनवेल असे मार्गक्रमण करून उरण तालुक्यातील जासई येथे रायगड जिल्ह्यातील यात्रेचा समारोप प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याने झाला. देशाच्या व राज्याच्या विकासासाठी येथील भूमिपुत्रांनी त्याग केला आहे. मी सुद्धा भूमिपुत्र आहे, त्यामुळे मला त्या प्रश्नांची जाण आहे. भूमीपुत्राला मंत्री केला आहे, त्यामुळे भूमीपुत्रांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटितपणे काम करणार असल्याचे कपिल पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
14 व्या वित्त आयोगातुन 2 लाख 292 कोटी व 15 व्या वित्त आयोग 2 लाख 36 हजार कोटी निधी माध्यमातून देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास साधून प्रवाहात आणण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले. या जनआशीर्वाद यात्रेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असुन यामुळेच त्यांचे नेते अनाठायी विधान करीत असून तुमच्या प्रतिक्रियेची आम्हाला गरज नसुन जनतेचा वाढता पाठिंबा हीच आमची यशाची नांदी असल्याचा टोला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांना लगावला. आगरी समाज हा विस्तृत पसरलेला असुन या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अन्न सुरक्षा, अंत्योदय, पंतप्रधान आवास योजना, मुद्रा लोन, शेतकरी सन्मान योजना अशा विविध योजनांचा उहापोह करत या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून निर्माण होत त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत असल्याचे अधोरेखित केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Devendra Ahirwar