Breaking News
शुल्लक कारणावरून शेजार्यांनी केेले दुष्कृत्य
नवी मुंबई : हिंगणघाट व औरंगाबाद येथे महिलांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच पनवेलमधील दुंदरे गावात महिलेला शेजार्यांनीच जाळण्याचा प्रयत्न करून नंतर तिला गळफास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोन्याचे गंठण चोरीला गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेतील मृत शारदा माळी या पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात पती दोन मुले व सून यांच्यासह राहत होत्या. त्यांनी गत आठवड्यात बनवेले सोन्याचे गंठण दाखवत असताना रात्रीच्या सुमारास शेजारी राहणार्या अल्पवयीन मुलीने त्यांचे गंठण उचलून नेले. त्यामुळे शारदा माळी यांनी तिच्या आईकडे गंठणबाबत विचारणा केल्याने त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. या भांडणात त्यांनी आपल्या मुलीचे नाव का घेता? असे बोलून शारदा व तिचे पती गोविंद माळी यांच्याशी वाद घालून भांडण काढले, तसेच त्यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर मुलीचे वडील गोपाळ पाटील व हनुमान पाटील या दोघांनी शारदा माळी यांच्या घरात जाऊन त्यांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. दरम्यान, दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा शेजारील पाटील व दवणे या दोघींनी शारदा माळी यांच्या घरासमोर जाऊन त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून शारदाबाई यांना मारण्याची धमकी दिली. तसेच देव तुला आज ठेवणार नाही, आजच्या आज तुला घेऊन जाईल, असे बोलून आरडाओरड केली. या घटनेनंतर शारदा माळी यांचे कुटुंबीय शांत राहिले. त्यानंतर सर्व जण आपापल्या कामावर निघून गेले. त्यानंतर दुपारी 1ः30 वाजण्याच्या सुमारास शारदाबाई या आपल्या घरातील पहिल्या मजल्यावर संशयास्पदरीत्या गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी मुलीची आई, शेजारील महिला दवणे, गोपाळ पाटील, हनुमान पाटील आणि दागिने चोरल्याचा आरोप असलेली अल्पवयीन मुलगी या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.
चौकट
या घटनेतील शारदाबाई या घरातील पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या, त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर साडी नसल्याचे तसेच त्यांचे केस व गळ्यावर भाजल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. तसेच त्यांच्या अंगावर पाणी टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शारदाबाई यांना प्रथम जाळण्याचा प्रयत्न करून नंतर त्यांना गळफास देऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप शारदाबाई यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी शेजारी राहणार्या दोन्ही कुटुंबावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. पनवेल तालुक्यात हळहळ व्यक्त करण्याबरोबरच संतापदेखील व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी पनवेलकरांकडून होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya