Breaking News
मुंबईत राज्याचे नवीन “महा पुराभिलेख भवन”
मुंबई – वांद्रे (पू) येथील 6691 चौ.मी. जागेवर राज्याचे नविन “महा पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा आज विधानसभेत सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली. राज्याच्या स्वतंत्र वस्तू संग्रहालय आणि कला भवनाची बीकेसी मध्ये उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शेलार यांनी केली होती त्यानंतर आज त्यांनी आणखी एक मोठी घोषणा विधानसभेत केली.
मंत्री शेलार यांनी आज विधानसभेत केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालय हा विभाग असून पुराभिलेख संचालनालयाची स्थापना 1821 साली झाली होती. संचालनालयाचे मुख्यालय मुंबई येथे असून पुराभिलेख विभागाकडे असलेल्या 17.5 कोटी कागदपत्रांपैकी सुमारे 10.5 कोटी कागदपत्रे या मुंबई स्थित मुख्यालयात आहेत.
सन 1889 पासून हे मुख्यालय सर कावसजी रेडिमनी बिल्डिंग म्हणजेच एल्फिस्टन कॉलेजच्या इमारतीमध्ये असून तेथे या कागदपत्रांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे. काळानुरुप अत्याधुनिक पध्दतीने कागदपत्रांचे जतन आणि संवर्धन करणे, जुनी कागदपत्रे जतनाकरिता स्विकारणे अशा अनेक गोष्टींवर जागेअभावी मर्यादा येत आहेत.
पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांचा हा राष्ट्रीय महत्वाचा ठेवा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पुराभिलेख संचालनालयाच्या वांद्रे (पू) येथील 6691 चौ.मी. जागेवर नविन “महा पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार आहे. तापमान आणि आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी शाखा, प्रतिचित्रण शाखा, देशविदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष, स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोई सुविधांनी युक्त अशी ही इमारत असेल, असे ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade