Breaking News
विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त होणाऱ्या आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत टाटा हॉस्पिटल क्रिकेट संघाची २५ वर्षे धुरा वाहणारे माजी क्रिकेटपटू डॉ. एस.एच. जाफरी यांचा समारोपदिनी विशेष गौरव होणार आहे. ही स्पर्धा १० ते १९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८ येथे रुग्णालयीन बलाढ्य संघांच्या सहभागाने रंगणार आहे. जखमी क्रीडापटूंना रुग्णालयीन सेवा उपलब्ध करण्यासाठी विविध हॉस्पिटलचे क्रिकेटपटू सहकार्य करीत असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी स्पर्धेचे सातत्य कायम राखले आहे.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीद्वारे होणाऱ्या स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेप्रसंगी गौरवमूर्ती डॉ.एस.एच. जाफरी यांच्या क्रिकेटमधील योगदानाचे कौतुक करण्यात येणार आहे. त्यांनी दोन दशकाहून अधिक काळ क्रिकेटचे मैदान अष्टपैलू खेळाने गाजविले असून निवृत्तीनंतरही टाटा हॉस्पिटल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक आहेत. ते वर्ल्ड कप-२०११चे मिडिया मॅनेजर व वर्ल्ड कप २०२३चे ऑपरेशन्स मॅनेजर होते. तसेच एक दिवसीय व टी-२० क्रिकेटच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाचे डॉ. जाफरी हे व्यवस्थापक देखील होते. क्रिकेट खेळाबरोबर त्यांनी सामाजिक व आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
डॉ. जाफरी यांच्या गौरवार्थ होणाऱ्या स्पर्धेत नानावटी हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी, लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई, सोमय्या हॉस्पिटल आदी नामवंत संघ सहभागी झाले आहेत. टॉप-१० संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक दिला जाणार आहे. सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यातील दोन्ही संघातील उत्कृष्ट खेळाडूला खास पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटन समितीचे कार्याध्यक्ष विराज मोरे व सरचिटणीस लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेटचे कप्तान प्रदीप क्षीरसागर, क्रिकेटपटू मनोहर पाटेकर, महेश शेट्ये आदी कार्यरत आहेत.
*******************************************************************
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE