Breaking News
*तर हार्दिक पांड्याच्या ६ चेंडूंत २८ धावा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० हा फलंदाजांचा खेळ... यामध्ये फक्त चौकार आणि षटकारांचेच विक्रम होतात. अशा स्थितीत कोणत्याही संघाने गोलंदाजीचा विक्रम केला तर नवलच नाही का? दिल्लीने सय्यद मुश्ताक अली टी२० चषक २०२४ मध्ये असाच एक विक्रम केला आहे. मणिपूरविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी करायला संधी दिली. टी२० क्रिकेटमधला हा विक्रम आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मणिपूरविरुद्ध खेळल्या गेलेल्या एसएमएटी टी२० स्पर्धेच्या सामन्यात दिल्लीने मणिपूरला २० षटकांत ८ गडी गमावून १२० धावांवर रोखले. या सामन्यात दिल्लीने यष्टिरक्षकासह सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी केली. याआधी, कोणत्याही संघाने कोणत्याही टी२० सामन्यात गोलंदाज म्हणून वापरलेल्या खेळाडूंची कमाल संख्या ९ होती.
या सामन्यात मणिपूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनीने सर्वांना चकित केले आणि सामन्यातील सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी दिली. तो स्वतः संघाचा यष्टिरक्षक आहे. त्याने सामन्यात २ षटके टाकली आणि १ बळीही घेतला. बडोनीने एक निर्धाव षटकही टाकले.
दिल्लीकडून दिग्वेश (२/८) आणि हर्ष त्यागी (२/११) यांनी चेंडूसह चांगली कामगिरी केली, तर प्रियांश आर्य (१/२) आणि आयुष सिंग (१/७) यांनीही विकेट घेतल्या. सर्व संसाधने वापरूनही दिल्लीला मणिपूरला सर्वबाद करता आले नाही. कसोटीतही असे एकदा घडले आहे. २००२ मध्ये भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी दिली होती.
स्पर्धेच्या अन्य एका सामन्यात हार्दिक पांड्याने त्रिपुराविरुद्ध चांगली कामगिरी केली. हार्दिक या स्पर्धेत बडोद्याचे नेतृत्व करत असून त्याने त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात २३ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.
पांड्याच्या झंझावाती फलंदाजीत पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता, डावखुरा फिरकी गोलंदाज पी सुलतानने एका षटकात सर्वाधिक २८ धावा केल्या. या षटकात पांड्याने ६, ०, ६, ६, ४, ६ धावा केल्या. म्हणजे षटकात पांड्याच्या बॅटमधून ४ षटकार आणि १ चौकार आला. पांड्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे बडोद्याने त्रिपुराचे ११० धावांचे लक्ष्य अवघ्या ११.२ षटकांत पूर्ण केले.
यापूर्वी हार्दिक पांड्याने तमिळनाडूविरुद्ध अशीच पॉवर हिटिंग केली होती, जिथे त्याने ३० चेंडूत ६९ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गुर्जपनीत सिंगने एका षटकात २९ धावा दिल्या होत्या. पांड्याने त्या षटकात सलग ४ षटकार मारले होते, यावरून पंड्याचा घातक फॉर्म दिसून येतो. या स्पर्धेमध्ये पांड्याने उत्तराखंडविरुद्ध २१ चेंडूत ४१ आणि गुजरातविरुद्ध ३५ चेंडूत ७४ धावा अशा दोन नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळल्या होत्या. त्याचे सातत्यपूर्ण पॉवर हिटिंग हे या वर्षीच्या एसएमएटीचे प्रमुख आकर्षण आहे. पांड्याच्या या पॉवरपॅक कामगिरीच्या जोरावर बडोदा यंदा सय्यद मुश्ताक अली टी२० चषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर