Breaking News
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या "महासंग्रामा"साठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांत बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. स्वाभाविकच, या दोन्ही आघाड्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील. अर्थात, बंडखोर, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे, जरांगे-पाटील हेही या निवडणुकीत निर्णायक मुद्दे ठरू शकतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून यामिनी यशवंत जाधव यांनी खरंतर विधानसभेचीच तयारी आपण करत असल्याचे दाखवून दिले होते. तीच तयारी महायुतीच्या उमेदवार म्हणून भायखळा विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेकडून तिकीट दिल्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराचा धडका लावला आहे. निवडणुकीत भाजप, मिलिंद देवरा, आणि शिंदे गट यांच्या एकीमुळे यामिनी जाधव यांच्या प्रचाराला अधिक धार आली आहे.
यामिनी जाधव या २०१२ साली मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम केले आणि आपली छाप उमटवली. भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत या क्षेत्रातून एमआयएमच्या वारिस पठाण यांनी बाजी मारली होती. त्यामुळे २०१९ सालच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा चंग बांधलेल्या शिवसेनेने यामिनी जाधव यांना तिकीट दिलं. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत यामिनी जाधव यांनी वारिस पठाण यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला.
यामिनी जाधव यांचा पूर्वीचा काळ पाहता त्या २०१२ पर्यंत एक गृहिणी होत्या. त्यांचे पती यशवंत जाधव हे त्यावेळचे विद्यमान नगरसेवक होते.२०१२ साली पालिका क्षेत्रातील वॉर्ड महिला आरक्षित झाल्याने यशवंत जाधव यांनी आपल्या जागेवर आपल्या पत्नी यामिनी जाधव यांना उमेदवार म्हणून उभे केले आणि त्या इतिहास घडवत नगरसेविका बनल्या. यशवंत जाधव यांची पुरेपूर साथ असल्यामुळे राजकारणाचे धडे त्यांना मिळाले. त्यांनी नगरसेविका म्हणून केलेल्या अनेक कामांचे दाखले आजही दिले जातात. विशेष करून महिलांसाठी, महिला बालकल्याण योजनेंतर्गत येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ शेकडो महिलांना मिळवून दिला. अनेक कामांना त्यांनी युध्दपातळीवर न्याय मिळवून दिला आहे. त्यातील एक म्हणजे नगरसेविका असताना मुंबादेवी परिसर गर्दीचा, दाटीवाटीचा, रहदारीचा परिसर असल्यामुळे दर्शनाला येणाऱ्या महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यास असुविधा होत होती ही बाब लक्षात घेता, त्यांनी त्याकाळात बेबी फिल्डींग कॉर्नर व पायलेट प्रोजेक्ट (आज त्यास हिरकणी कक्ष म्हणतात) राबविला. ह्या प्रकल्पामुळे त्यांचे नाव आजसुद्धा सर्व नागरिकांच्या मुखावर सातत्याने असते. हा प्रकल्प पहिल्यांदा त्यांनी आपल्या प्रभागात राबविला. तसेच आमदार म्हणून काम करत असताना राज्याच्या अर्थसंकल्पीय सत्रामध्ये तब्बल ३:३० तास अभ्यासपूर्ण मुद्देसूद रेकॉर्ड ब्रेक भाषण करून सभागृहातल्या अनेक मान्यवर आमदारांसमोर आपली प्रतिमा उमटवली. सार्वजनिक सेवेतील त्यांच्या समर्पणाची आणि मुंबईतील लोकांप्रती त्यांच्या बांधिलकीची दखल विधानसभा क्षेत्रातल्या मतदारांनीही घेतली. त्याचबरोबर राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा "उत्कृष्ट भाषण" पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक सामान्य गृहिणी, शिवसैनिक, नगरसेविका, आमदार आणि आता माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान. असा हा सन्मान त्यांनी भायखळा विधानसभेतील रहिवाशांना समर्पित केला.
यामिनी जाधव यांनी मुंबई विद्यापीठाच्या लाला लजपतराय कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी १९८८ मध्ये पूर्ण केली आहे. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने राजकारणातील त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांचा पाया भक्कम केला आहे.
विधानसभेच्या भायखळा मतदारसंघातून त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांची उमेदवारी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर पक्षाचा विश्वास आणि मुंबईच्या नागरिकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता दर्शवते.
मतदारसंघाच्या संदर्भातील विविध प्रश्न सरकार दरबारी, विधिमंडळात आणि प्रशासनाकडे त्यांनी उपस्थित केले. दक्षिण मुंबईत सर्वांच्या जिव्हाळ्याचा असलेला पुनर्विकासाचा प्रश्न, पीएमजीपी इमारतींचा प्रश्न, उपक्रम प्राप्त इमारतींचा प्रश्न, पोलीस वसाहतींचे प्रश्न, अमली पदार्थांचे प्रश्न, रुग्णालयातील समस्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक व्यासपीठावर त्यांनी मांडल्या. इमारतींच्या दरुस्तीसाठी म्हाडाकडे दाद मागितली. भायखळ्यातील चौकांचे, संरक्षक भिंतींचे सुशोभीकरण, आई गावदेवीच्या डोंगरावर अवलोकन सज्जा, महाराणा प्रताप पुतळा उभारणी, राणीबागेमध्ये विविध सुविधा, नबाब टँक रुग्णालयाची निर्मिती, पाण्यापासून वंचित असलेल्या दारूखाना परिसराला पाणीपुरवठा, बाबू गेनू भाजी मंडई असे अनेक प्रश्न मार्गी लावले. फूड ट्रक, फिरते वाचनालय असे अभिनव उपक्रम मतदारसंघात राबविले. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा विषयक उपक्रमांना सातत्याने सक्रिय पाठिंबा दिला. सामाजिक जीवनात पक्षाचे मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे कारण केंद्रात आणि राज्यात विकासाचे नवे पर्व प्रचंड गतीने सुरू झाले आहे. केंद्राच्या असंख्य योजना आज सुरू आहेत. राज्य सरकारनेही त्या योजनांमध्ये भर घातली आहे. मुंबई शहराचा विचार करता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण, कौशल्य विकास योजना, तीर्थक्षेत्र दर्शन योजना अशा अनेक योजना तसेच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला आहे. मेट्रो ३ ची सेवा मुंबईकर घेत आहेत. पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प येत्या काळात मार्गी लागणार आहेत. समृद्धी महामार्ग मुंबईला जोडला जाणार आहे. जगातील सर्वात मोठे वाढवण बंदर मार्गी लागणार आहे. अटल सेतूमुळे महामुंबई परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. सर्व प्रकल्प आणि योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी भायखळा विधानसभा क्षेत्रातल्या अनेक समस्यांवर काम करण्याची त्यांची इच्छा आहे, ज्यात अर्थव्यवस्था, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
या क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि उद्योजकतेची संस्कृती विकसित करणे यावर त्या प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहेत.
शाळा आणि महाविद्यालय अद्ययावत करताना शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करण्याचा त्यांचा मानस आहे. आरोग्य सेवांची सोय वाढवण्यासाठी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे बांधणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे ह्यासाठी त्यांचा प्रकल्प तयार आहे. रस्ते, पुल आणि इतर मूलभूत सुविधा वाढवण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी पहिल्या १०० दिवसांची योजना तयार आहे.
विधानसभा क्षेत्रातल्या समस्यांवर काम करण्यासाठी सरकार आणि स्थानिक समुदाय यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्या आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी त्या वचनबद्ध आहेत.
यामिनी यशवंत जाधव यांच्या राजकीय जीवनाचा आढावा घेताना, त्यांचे पती यशवंत जाधव यांच्या राजकीय कारकिर्द जाणून घेणे आवश्यक आहे. यशवंत जाधव हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत आणि मुंबईतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
*राजकीय कारकीर्दी*
- १९९७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य म्हणून निवड झाली
- २००७ मध्ये पुन्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निवड झाली
- २००८ मध्ये बाजार आणि उद्यान समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
- २०१७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली आणि गृह समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले
- २०१८ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
यशवंत जाधव यांनी मुंबईतील विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर काम केले आहे. त्यांनी मुंबईतील नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
यामिनी यशवंत जाधव यांच्या राजकीय जीवनाचा आढावा घेतल्यावर, त्यांचे पती यशवंत जाधव यांची राजकीय कारकीर्दी आणि त्यांनी केलेले कार्य पाहता, त्यांची जनमानसातील प्रतिमा उंचावलेली आहे आणि त्यांना एक जाणीव आणि कार्यक्षम नेता म्हणून पाहिले जाते. यामिनी यशवंत जाधव यांची राजकीय कारकीर्द हे समर्पण, परिश्रम आणि जनसेवेतील वचनबद्धतेचे ज्वलंत उदाहरण आहे. भायखळा येथे विकासपर्व सुरू आहे. नगरसेविका ते विधानसभेच्या सदस्य असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्या मुंबईतील लोकांची सेवा करत राहिल्याने त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी शहराचे भविष्य घडवेल यात शंका नाही. स्वतः कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करून आईच्या ममत्वाने त्या भायखळा विधानसभेतील जनतेवर केलेली माया अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुन्हा सज्ज झाल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर