Breaking News
९९ उमेदवारांची घोषणा करून भाजपाने मारली बाजी
ट्रेण्डिंग
मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करून भाजपाने बाजी मारली आहे, लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर न केल्याने झालेले नुकसान टाळण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे समजते.
नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवणार आहेत. तर कामठी मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदूरबार मतदारसंघात विजयकुमार गावित, जामनेरमधून गिरीश महाजन, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार, यवतमाळमधून मदन येरावार, परतूरमधून बबनराव लोणीकर, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून अतुल सावे, मलबारहिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा, कुलाबा मतदारसंघात राहुल नार्वेकर, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील, कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे, कणकवली मतदारसंघामधे नितेश राणे, मिरजमध्ये सुरेश खाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण, ठाणे मतदारसंघात संजय केळकर, ऐरोलीमधून गणेश नाईक यांना उमेदवारी दिली असून बेलापूर मध्ये मंदा म्हात्रे यानाच पुन्हा उमेदवारी देऊन संदीप नाईक यांना नाकारण्यात आले आहे.
मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा, कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकर, चारकोप मतदारसंघात योगेश सागर, मालाड पश्चिममध्ये विनोद शेलार,अंधेरी पश्चिममध्ये अमित साटम, विलेपार्ले मतदारसंघात पराग अळवणी, घाटकोपर पश्चिम मतदारसंघात राम कदम, वांद्रे पश्चिम मतदारसंघात आशिष शेलार, सायन कोळीवाडा मतदारसंघात तमिळ सेल्वम, वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकर,यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
त्याचप्रमाणे आजच्या यादीत १३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राज्यसभेवर निवडून गेल्यामुळे भोकर मतदारसंघात त्यांची कन्या ऍड. श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चिखली मतदारसंघात श्वेता महाले, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, नाशिक पश्चिम सीमा हिरे, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे, दहिसर मतदारसंघात मनीषा चौधरी, गोरेगावमध्ये विद्या ठाकूर, पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ, शेवगाव मतदारसंघात मोनिका राजळे, केजमध्ये नमिता मुंदडा, यांना पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे तर फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांना राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आलेल्या हरिभाऊ बागडे यांच्या जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे तर कल्याण पूर्व मतदारसंघात सुलभा गायकवाड या वादग्रस्त आमदार गणपत गायकवाड यांच्या जागेवर आणि श्रीगोंदा मतदारसंघात प्रतिभा पाचपुते यांना बबनराव पाचपुते यांच्या जागी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपानं दिली आहे.
चिंचवड मतदारसंघात दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी शंकर जगताप यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली आहे. मीरा भाईंदर ची जागा मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे