Breaking News
विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पैसे वाटप , विरोधकांची कारवाईची मागणी
मुंबई - पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात भाजपा कडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार समोर आला असून नालासोपारा पूर्वेकडील विवांता हॉटेल येथे पैसे वाटले जात होते अशी तक्रार असून त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे देखील उपस्थित होते, त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली असून निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पैसे वाटपाचा हा प्रकार समोर आल्यानंतर नालासोपाऱ्याचे मावळते आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी त्वरीत धाव घेत निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर भाजपाकडून पैशाचा वापर होत आणि हे दुर्दैवी आहे असे म्हणत क्षितिज ठाकुरांनी संताप व्यक्त केला आहे.
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असून पोलीस वाहनातून रसद पाठवल्याच्या बातम्याही आल्या. आतातर भाजपाचे राष्ट्रीय नेते माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचे उघड झाले आहे. भाजपा शिंदे सरकारचा सपशेल पराभव होत असल्याने आता ते भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशाच्या जोरावर जनतेची मते विकत घेऊन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न असून भाजपाचा खरा चेहरा उघडा पडला आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भारतीय जनता पक्ष व विनोद तावडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नाना पटोले यांनी केली आहे.
हे प्रकरण दडपण्याचा प्रकार होऊ शकतो पण निवडणूक आयोगाने कोणाच्याही दबावाखाली न येता निष्पक्ष, पारदर्शक आणि कडक कारवाई करून कायद्याच्या राज्यात सर्व समान आहेत हे दाखवून द्यावे. विधानसभा निवडणुका निष्पक्ष तसेच पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे परंतु महिना भरातील घटना पाहता सत्ताधारी पक्षांवर कारवाई केली जात नसून फक्त विरोधी पक्षांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे असा आरोप पटोले यांनी केला.
निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.
दरम्यान विनोद तावडे यांच्यासह उमेदवार राजन नाईक आणि इतर दोन अडीचशे कार्यकर्ते यांनी निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर ही बैठक घेतली तसेच मतदारसंघामध्ये बाहेरील व्यक्ती अथवा मतदार यांना मतदानाच्या आधी ४८ तास राहण्याची परवानगी नसतानाही तावडे आणि इतर यांच्या विरोधात पोलिसांनी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar