Breaking News
ग्रामस्थांनी ‘देशी जुगाड’ करत उभारला पूल…
ठाणे - मुरबाड तालुक्यातील फांगुळ गव्हाण हद्दीत अडीच हजार लोकसंख्या असलेली 3 महसुली गावे आणि 4 आदिवासी पाड्यात जाणाऱ्या रस्त्यावर भलामोठा ओढा असल्यानं या भागातील रुग्ण, वृद्ध, विद्यार्थ्यांसह महिलांना जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून या भागातील ग्रामस्थ या ओढ्यावर पूल उभारण्याची मागणी करत आहेत मात्र, संबधित अधिकारी या ठिकाणी पूल उभारणीसाठी चालढकल करत असल्यानं अखेर गावकऱ्यांनीच श्रमदानानं ‘देशी जुगाड’ करत पूल उभारला आहे.
कल्याण-नगर राष्ट्रीय मार्गावर माळशेज घाटाच्या पायथ्याशी मुरबाड तालुक्यात फांगुळगव्हाण ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत तीन महसुली गावं आणि चार आदिवासी गाव-पाडे आहेत. विशेष म्हणजे देशात सर्वत्र स्वातंत्र्योत्सव धुमधडाक्यात साजरा केला गेला. मात्र, अद्यापही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेकडो गाव पाड्यावर जाण्यासाठी रस्ता, वीज, पाणी या बांधवाच्या नशिबी आलेलं नाही. त्यातच, मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रम शाळेत फांगुळगव्हाण, साखरवाडी, निरगुडपाडा या तीन वाडीतील 60 ते 65 विद्यार्थी दररोज जवळपास 5 किमी अंतर पार करुन येतात. गावात येणाऱ्या मार्गावर एक भलामोठा ओढा आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांना हा ओढा रोज पार करुन यावा लागतो.
गुरुवारी अचानक या ओढ्याचं पाणी वाढल्यानं एक विद्यार्थी पाण्यात वाहून जात असताना त्याला गावकऱ्यांनी वाचवलं. या घटनेनंतर शासनाच्या कामाची वाट न पाहता गावकऱ्यांनी पूल बांधण्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत आदिवासी काळातील पारंपरिक पद्धतीनं पूल उभारण्याचं ठरलं. तसंच गावकऱ्यांनी मिळून यासाठी 40 हजार रुपये वर्गणी गोळा केली. ग्रामपंचायतीनेही या पुलासाठी टाकाऊ लोखंड दिले. त्यानंतर ओढ्यावर लाकडी दांडके तारेनं बांधून त्यांचे दगड-गोटे वापरून 2 बुरूज बनवले. तसंच त्यावर लोखंडी सळ्या टाकून तात्पुरता पूल तयार करण्यात आला.
माळशेज घाटाच्या पायथ्याशी हे गाव पाडे असल्यानं घाट माथ्यावरील पावसाच्या पाण्याचा प्रवाह सरळ या गावात येतो. त्यामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. दरम्यान, 24 जून रोजी रस्त्याअभावी याच भागातील ओजिवले कातकर वाडीवरील अदिवासी गरोदर महिला चित्रा संदिप पवार हिच्या व्हायरल व्हिडिओमुळं शासकीय यंत्रणा खळबडून जागी झाली होती. दुसरीकडं कोट्यवधी रुपये खर्चून माळशेज घाटात स्कायवॉक तयार होऊ शकतो. मात्र, या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्यावर साधा पूल बांधून मिळत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केलीय.
या संदर्भात महिला सरपंच सविता रवींद्र भला यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, “गेल्या 15 वर्षांपासून आम्ही हा पूल बांधून देण्यात यावा यासाठी प्रशासनाकडं मागणी करतोय. मात्र, संबंधित प्रशासन याकडं लक्ष देत नसल्यानं शेवटी आम्हीच 100 ते 125 गावकऱ्यांनी श्रमदान करुन हा पूल उभारला.” तर याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते किरण कारभार यांनी सांगितलं की, “सदरील पूल 35 फूट लांबीचा असून 2 फूट रुंद आहे. मात्र, या भागात पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं हा पूल केवळ तात्पुरत्या स्वरुपात उपयोगात येईल.
यासंदर्भात ग्रामसेवक अधिकारी बाळू कोकणे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंयातमध्ये शिल्लक असलेलं लोखंड या पुलासाठी वापरण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महिन्याभरापूर्वीच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लोक या ठिकाणी पुलाचं मोजमाप घेऊन गेलेत, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून मुरबाड तालुक्यात भाजपाचं वर्चस्व आहे. आमदार किसन कथोरे यांच्यासह नगरपंचायत, बहुतांश ग्रामपंचायत, विविध शासकीय यंत्रणा भाजपाच्या ताब्यात आहे. मात्र, तरीदेखील हा तालुका मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar