Breaking News
नवी मुंबई ः नेरुळ परिसरातील शैलेश टॉवर या इमारतीच्या रंगकामासाठी तयार करण्यात आलेला बांबूचा स्ट्रक्चर अचानक कोसळला. या घटनेत 14 कामगार जखमी झाले आहेत. दरम्यान, कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षेसाठी साधने न दिल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील नेरुळमधील शैलेश टॉवर या इमारतीत रंगकाम व वॉटर प्रूफिंगचे काम सुरू होते. या कामासाठी परांची उभारल्या होत्या व या कामासाठी 20 पेक्षा अधिक कामगार काम करीत होते. त्यातील 14 कामगार हे परांचीवर बसून काम करीत होते. बुधवारी शैलश टॉवरमधील रंगकाम पूर्ण झाल्यावर परांची सोडण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना दुसर्या व तिसर्या माळ्यावरील बांबूंची परांची तुटली. परांचीवर काम करत असलेले कामगार खाली पडले. या अपघातात 14 कामगार जखमी झाले आहेत. यातील 2 कामगार गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच असणार्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परांचीवर अडकलेल्या कामगारांना स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यात दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.
रंगकाम व वॉटर प्रूफिंगच्या कामाचा कंत्राट दिलेल्या ठेकेदाराने या कामगारांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य पुरविले नव्हते. त्यामुळे बांबूच्या परांची कोसळल्याने कामगार जखमी झाले. याप्रकरणी कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार संतोष रामटेके याच्याविरुद्ध नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya