Breaking News
मुंबई दि.११(विशेष प्रतिनिधी) :गिरण्या बंद करतांना गिरण्यांच्या चाळींचे पुनर्वसन करून रहिवाशांना ४०५ चौरस फुटाचे घर मोफत देण्याचे शासनातचे आदेश आहेत,असे असतांना मालक चाळीच्या पुनर्वसना बाबत दुर्लक्ष करीत आहेत.त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विकास नियमावली ५८ अंतर्गत आपल्या जमिनीवर व्यावसायिक संकुल आणि टोलेजंग टॉवर उभे केले आहेत.परंतु चाळींचा पुनर्विकास मात्र अद्याप केलेला नाही!तेव्हां मालक या चाळींचा पुनर्विकास करत नसतील तर या चाळींचा ताबा म्हाडाकडे सोपवावयास हवा,अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी येथे गिरणी कामगारांच्या सभेत बोलताना व्यक्त केली.
बॉम्बेडाईंग स्प्रिंग मिलच्या रखडलेल्या चाळींच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नावर कामगारांनी आपली गाऱ्हानी मांडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्याकडे काही काळा पासून सभेची मागणी केली होती.त्याप्रमाणे नुकतीच मजदूर मंझील मध्ये मनोहर फाळके सभागृहात ही सभा पार पडली. सचिन अहिर म्हणाले, शंभर वर्षापेक्षा अधिक काळापासून मोडकळीस आलेल्या या चाळींवर दुर्दैवाने अपघात होऊन जिवीतहानी होण्यापूर्वी या इमारतीचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे.
जी.डी.आंबेकर मार्गावर जवळपास सन १९१६ पासून बॉम्बडाईंग स्प्रिंग मिल कामगा रांची वसाहत उभी आहे.जीव मूठीत घेऊन जगणाऱ्या या चाळींमधील रहिवाश्यांच्या कमिट्यांनी, मालककडून आलेल्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावावर एकमताने दुरुस्त्या करून,सुधारित करार मंजुरीसाठी मालकाकडे पाठवला.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी रहिवाशांच्या या कराराला सहमती दाखविणारे पत्रही दिले.मात्र अजून पर्यंत बॉम्बे डाईंग मालकाकडून सकारात्मक उत्तर आलेले नाही,त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरलाआहे.या इमारतीमधील अनेक घरांचे सिलिंग कोसळले असून नादुरुस्त सांडास-मुताऱ्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न जटील बसला आहे.
रहिवाशांनी मांडलेल्या या व्यथेवर बोलताना सचिन अहिर म्हणाले,या इमारत पुनर्बांधणीवर लवकरच आपण लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधीतांशी चर्चा करून
सन्माननीय तोडगा काढणार आहोत.एकूण मुंबईतील खाजगी तसेच सरकारी गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न आपण राज्य सरकारपर्यंत नेला आहे.संघाने केलेल्या मागणीनुसार राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थित या प्रश्नावर संबंधितांची बैठक पार पडली आहे.संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे,गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नाला संघटनेने प्राधान्य दिले आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण म्हणाले, कंपनीचे मालक नसली वाडिया,वास्तुविशारद हिरेन ठक्कर यांच्या पर्यंत कामगारांच्या समस्या पोहोचविण्यात आल्या आहेत..हा प्रश्न सनियंत्रण कंमिटीपुढे मांडण्यात आला असून त्यांनी चाळीचा पूनर्विकास तीन वर्षात करावा असे आदेश २०१९साली दिले आहेत. पण मालकांनी चालढाकलपणा केला आहे.या प्रश्नावर आता संघटनेला कठोर पाऊल उचलावे लागेल, असेही चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले.सभेत उमाकांत जगदाळे, विशाल यादव,लवू परब,संतोष गुरव,राजू पेडणेकर, सुर्यकांत मुळे यांची भाषणे झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya